दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे भीम जयंती महोत्सव 2026 साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
यासाठी आयोजित बैठकीत महोत्सवाच्या अध्यक्षपदी शशांक गायकवाड तर उपाध्यक्षपदी दिगंबर रिकीबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात पार पडली.
यावेळी दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर, 11 एप्रिल रोजी 135 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तर 12 एप्रिल रोजी प्रबोधनात्मक मनोरंजन कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध भीमगीत गायिका भाग्यश्री ताई इंगळे यांचा लाईव्ह भीमगीतांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, दौंड शहरात महोत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






















